• Slide
  • Slide
  • Slide

महाड तालुका


सुस्वागतम्

       महाडची नोंद इ.स. पूर्व २२५ मध्ये कोकण किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर व व्यापारी केंद्र म्हणून आढळते. सावित्री, गांधारी, काळ या तीन नदया महाड परिसरात असून बाणकोट ही जवळची खाडी आहे. या खाडीतून बोटीद्वारे व्यापारी वाहतुक सतत चालत असे.

       बौद्ध काळानंतर महाडचा इतिहास फारसा ज्ञात नाही. तेराव्या शतकात कोकणावर देवगिरीच्या यादवांचा अंमल असताना महाड बंदराचे व्यापारी महत्त्व खूप वाढले. बहमनी सत्तेच्या विघटनानंतर महाडलगतचा प्रदेश आदिलशाहीच्या वर्चस्वाखाली होता. खुद्द महाडच्या कोटाचे बांधकाम आदिलशाहीतील असावे. सन १५३८ मध्ये पोर्तुगीज गव्हर्नरने महाडचा उल्लेख गव्हाची मोठी व्यापारी पेठ असलेले शहर, तर सावित्री नदीचा उल्लेख मुध सरिता असा केला आहे. घाट माथ्यावरून गहू व महाबळेश्वरच्या जंगलातील मध महाडवरून जलमार्गे निर्यात होत असे.

      इ.स.१६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पाडाव करून रायगड किल्ला ताब्यात घेतला. तेव्हापासून महाडची भरभराट झाली. आदिलशाहीच्या वेळच्या कोटाची आवश्यक अशी दुरुस्ती करून ते आपले वास्तव्य स्थान बनविले होते. राजवास्तव्या प्रमाणे राजधानीचे बंदर म्हणून महाड महत्त्व पावले.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चवदार तळयाचा सत्याग्रहामुळे महाडचे नाव भारतभर पसरले. दलित उद्धारासाठी केलेला हा सत्याग्रह महत्त्वाच्या आंदोलनापैकी एक मानले जाते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातही महाडने नेत्रदीपक कार्य केले.
Tahasildar