• Slide

  • Slide

  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide

सुधागड तालुका


सुस्वागतम्

      सुधागड तालुका म्हणजे पाली तालुकाच होय कारण पाली हे तालुक्याचे मुख्यालय आहे. सुधागड हा तालुका ज्या भोर संस्थानात पुर्वीपासुन होता, त्या भोरच्या राजे साहेबांची कुलस्वामीनी भोराई देवी ही तालुक्यातील सुधागड किल्ल्यावर आहे. तालुक्याची पुर्वसिमा पुणे जिल्हा आणि सहयाद्रीच्या लहान मोठया रांगा लागुन आहेत. पश्चिम सिमेला पेण व रोहा हे तालुके असुन दक्षिणेस माणगांव आणि उत्तरेला खालापुर तालुका आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ पाली गांवापासुन ८ कि.मी. अंतरावर व मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग ३५ कि.मी. अंतरावर आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाना जोडणारा वाकण – पाली - खोपोली हा राज्यमार्ग आहे. तालुक्यात सुमारे ५८०० हे.आर. जमिनीमध्ये भाताचे प्रमुख पिक घेतले जाते तसेच वरकस जमिनीमध्ये नाचणी, वरी, वाल अशी पिके घेतली जातात.

      सुधागड तालुक्यामध्ये अष्टविनायक श्रीबल्लाळेश्वर, सरसगड किल्ला, सुधागड किल्ला ,घनदाट जंगलातील ठाणाळे लेणी, नेणवली लेणी, भृगॠषीचे लेणे, सुधागड तालुक्यातील चारधाम यात्रा सद्गती देणारा उध्दर रामेश्वर, व्याधीमुक्त करणारा श्रीविरेश्वर, कर्मयोगाचा संदेश देणारा श्री सिध्देश्वर, माणखो-यातील श्री उत्तरेश्वर,‍ आदिमाया श्री कोंडीदेवी, ग्रामदेवता श्री वरदायिनी, श्रीक्षेत्र एकविस गणपती, श्री सिध्दलक्ष्मी गणेश जाभुंळपाडा, उन्हेरे येथील गरम पाण्याचे झरे, माणखो-यातील मृगगड, तसेच पावसाळयात पडसरे येथिल झ-याचे दर्शन विलोभनीय आहे इत्यादी ऐतीहासीक व पर्यटन स्थळे येथे आहेत.

      उंचसखलपणा हे तालुक्याचे प्राकृतिक वैशिष्ट असल्याने पुर्वेकडे ‍ शिखरे व सहयाद्रीचे खिंडीयुक्त डोंगरमाथे आहेत. सह्याद्रीच्या डोंगरदर्यांमध्ये सदाहरित घनदाट जंगले असून त्यामध्ये विविध प्रकारचे वृक्ष आणि पशुपक्षी आहेत. प्राचीन काळी सह्याद्रीच्या भिंती, घनदाट जंगले व नद्यांच्या प्रवाहामुळे सुधागड तालुका अलग पडलेला होता. कळंब गावाकडील आंबवणे घाटातून आणि ठाणाळे नाडसुर भागातील सवाष्णी घाटाने मुळशी तालुक्यात प्रवेश करता येतो. तालुक्यातून वाहणाऱ्या अंबा, वळकी, दातपाडी व कुंडलिका या नद्यांचे उगम पूर्वेकडील डोंगरभागातून झालेले आहेत.

Tahasildar